
चिखली/ प्रतिनिधी
तालुक्यातील मलगी येथे धम्मदान कार्यक्रमासाठी गेलेल्या काही बांधवांमध्ये वाहन रस्त्यात लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार भदंत धम्मपाल थेरो (वय ५३, व्यवसाय – धम्मप्रचार व प्रसार) रा. मांडणी सारनाथ ता. खामगाव जि. बुलडाणा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या सहकाऱ्यांसह मलगी येथे धम्मदानासाठी गेले होते. त्यांच्या सोबत समाधान पानपाटील (रा. मोहलाई ता. भोकरदन) हे चालक म्हणून उपस्थित होते. एम.एच. २१ बी.एच. ५२६१ क्रमांकाच्या वाहनाने ते सकाळी सुमारे ९.४५ वाजता गावात पोहोचले.
दरम्यान, गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे केले असता, तेथे आलेल्या ट्रॅक्टरचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी शिवीगाळ करत अपमानास्पद वक्तव्ये केली तसेच मारहाण करण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर भदंत थेरो यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्याद नोंदवून संबंधितांविरुद्ध भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे


