प्रतिमा त्याच ठिकाणी पूर्ववत स्थापित करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

बुलडाणा/ प्रतिनिधी
बुलडाणा नगर परिषद नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानी असलेली घटनाकार डॉ. आंबेडकर यांची काढून टाकलेली प्रतिमा त्याच ठिकाणी पूर्ववत स्थापित करण्यात यावी अन्यथा २ फेब्रुवारीपासून नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा बुलडाणा शहरातील संविधानप्रेमी नागरिकांनी निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिला आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा शहर ठाणेदार व बुलडाणा तहसिलदारांना देण्यात आल्या आहेत. निवेदनात नमुद आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालिन नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांनी पदभार स्विकारला होता. त्यावेळी सर्वसाक्षीने, संमतीने संविधानाची सतत जाणिव ठेऊन कार्यभार चालावा या शुध्द हेतूने संविधान शिल्पकार यांची भव्य व आकर्षक प्रतिमा नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानी स्थापित करण्यात आली. काही दिवसानंतर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती प्रतिमा काढून टाकली. तेंव्हा काही जागरूक व्यक्तींच्या तो प्रकार निदर्शनास आला व त्यांनी ती प्रतिमा पूर्वस्थितीत पुनस्थापित करावी याकरीता नगर परिषद परिसरात ठिय्या आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा कुठे जोर मुख्याधिकारी यांनी ती प्रतिमा पूर्ववत स्थापित केली. तब्बल ९ वर्षानंतर ५ जानेवारी २६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी पदभार स्विकारला. परंतु नगराध्यक्ष यांचे आसनाच्या शिर्षस्थानी असलेली संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढून टाकण्यात आली व त्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले. निवेदनात नमुद आहे की, भारतीय संविधानाद्वारे भारतीय संविधान अनुछेद २४३-क्यु अन्वये नगर परिषदेची स्थापना करण्यात आली आणि नागरिकांच्या सेवेसाठी शासन आणि प्रशासनाची नेमणूक करण्यात आली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान करीत आहेत. त्यामुळे निवेदनात मागणी केली आहे की, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सन्मानपूर्वक ‘जैसे थे’ च्या स्थितीत त्वरित स्थापित करावी. सदर प्रतिमा नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानी कायमस्वरूपी सुरक्षित करून तशा प्रकारची भविष्यकालीन तसेच ती नविन इमारतीमध्ये सुध्दा नियमानुकुल राहील याची तजविज करण्यात यावी. जेणेकरून अशा अष्लाघ्य प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही. सोमवार २ फेब्रुवारीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुनर्स्थापित न झाल्यास नगर परिषद मुख्याधिकारी यांचे विरोधात नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.


