पोलिस स्टेशन अंतर्गत शाळांना ठाणेदार निखिल निर्मल यांची प्रत्यक्ष भेट

अमडापुर (प्रतिनिधी) : पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाअंतर्गत शाळा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. ठाणेदार निखिल निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पोहेकॉ. शिवाजी सुरडकर, गजानन काकडे, रणजीत सरोदे तसेच ट्राफिक विभागातील कर्मचाऱ्यांनी पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.
संपूर्ण जिल्ह्यात १ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी मार्गदर्शन करताना १८ वर्षांखालील मुला-मुलींनी वाहन चालवू नये, तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालवताना वैध परवाना (लायसन्स) असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.
दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, हेल्मेटमुळे अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून संरक्षण मिळते आणि जीव वाचण्याची शक्यता वाढते, हे उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यासोबतच वाहन चालवताना आर.सी. बुक, लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
ठाणेदार निखिल निर्मल हे स्वतः प्रत्येक बीटमधील शाळांना भेट देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत असून, भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


