
बुलडाणा :(प्रतिनिधी)स्थानिक मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे दि. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्त्री शिक्षण, सामाजिक समता व प्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“तू कोणाची सावित्री नाहीस फक्त,तू परिवर्तनाची सुरुवात आहेस,
जिथे स्त्रीला वस्तू मानतात तिथे तू माणूस म्हणून बोलतेस,
तू प्रश्न विचारतेस म्हणून बंडखोर ठरतेस,पण इतिहास नेहमी अशाच स्त्रियांनी घडतो, तू विवेकाची मशाल आहेस…”
अशा आशयगर्भ व प्रेरणादायी ओळींनी युक्त कविता प्रा. डॉ. शीला दाभाडे रोकडे यांनी सादर केली. त्यांच्या कवितेतून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच आज महिलांना शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा व विचारस्वातंत्र्याचा हक्क मिळाल्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.
तसेच प्रा. बलवान विणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजच्या समाजात असलेली गरज आपल्या भाषणातून स्पष्ट केली.तर प्रा. डॉ. की. वा. वाघ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समृद्धी गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


