अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी-अन्यथा तीव्र आंदोलन:सतीश पवार यांचा प्रशासनाला इशारा

बुलढाणा/ प्रतिनिधी
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एक किलोमीटर अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा वाचवा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमुद आहे की, आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत ‘एक किलोमीटर अंतर’ ही अट घालण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत किमान एक महिना वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. माहितीनुसार, आरटीई प्रवेशासाठी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचे निवासस्थान संबंधित शाळेपासून एक किलोमीटरच्या हद्दीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन किलोमीटरपर्यंत होती. शहर व ग्रामीण भागातील अनेक शाळा नागरी वसाहतींपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे. पालकांचे म्हणणे आहे की, एक किलोमीटरची अट कठोरपणे लागू केल्यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तीन किलोमीटरची अट लागू करावी किंवा किमान सध्या असलेली अट शिथिल करावी. तसेच, वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून तो अबाधित राहावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती संबंधितांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सतीश पवार, सुरेश जाधव (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख) प्रा. कडुबा पैठणे, अर्जुन खरात, समाधान झिने, मिलींद जाधव, चंद्रकांत धुरंदर, विजय पवार आदींसह इतरांच्या सह्या आहेत.


