
बुलडाणा/प्रतिनिधी
कुठलीही चळवळ, आंदोलन, विचार प्रसारित करण्यासाठी प्रसार माध्यम अतिशय महत्वाचे असतात त्यामुळे सदर विचार जनतेत पोहचविणे सहज शक्य होते यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीत ३१ जानेवारी १९२० रोजी “मुकनायक ” या पाक्षिक वृत्तपत्राची सुरुवात केली. ज्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले परिवर्तन, प्रबोधन करणारे, स्वाभिमान जागविणारे व गुलामी नाकारणारे क्रांती विचार प्रकाशित करून जनतेत विश्वास निर्माण करू शकले. धार्मिक गुलामी जातीवाद यामुळे पिचलेला, शोषित वंचित मुका समाज जागृत होऊन स्वाभिमानी म्हणून जगण्यास सज्ज झाला. या शोषित वंचीत मुक्या समाजाला बोलण्याचं बळ दिल. या वंचित शोषितांचा मुका आवाज… मुकनायकाने क्रांतीच्या लोकलढ्यात परावार्तीत केला.. असे मत लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संवाददाता तथा मीडिया वार्ता न्यूज चे महाराष्ट्र सिनियर रिपोर्टर प्रा. गजेंद्र गवई यांनी पत्रकार भवन बुलडाणा येथे आयोजित आंबेडकरी चालवळीचा पत्रकार दिन अर्थात मुकनायक वृत्तपत्राचा १०६ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
रिपब्लिकन न्यूज पेपर असोशिएशन बुलडाणा जिल्हा च्या वतीने पत्रकार भवन, बुलडाणा येथे आंबेडकऱी चळवळीचा पत्रकार दिन -मुकनायक वर्धापन दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक देशोन्नती वृत्त समूहाचे संपादक तथा शेतकरी, विदर्भ वादी नेते प्रकाश पोहरे होते तर वनश्री डॉ. उर्मिला ठाकरे,असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष प्रा. एस पी हिवाळे, शासकीय अधिस्वीकृत समिती सदस्य,जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, गुड इव्हिनिंग सिटी संपादक पत्रकार रंजितसिंग राजपूत, प्रा. सुभाष लहाने, प्रा गजेंद्र गवई, पत्रकार संघ महिला अध्यक्ष मृणाल साळवे,भानुदास लकडे, गायिका सुनिता काकडे, शाहिर मल्हारी गवई आयोजक जिल्हाध्यक्ष प्रा. भास्कर इंगळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रारंभी समस्त मान्यवर यांनी दीप प्रज्वलीत करून महामानवाच्या प्रतिमास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समस्त मान्यवर यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी एस हिवाळे यांनी केले. याप्रसंगी प्रा. भास्कर इंगळे संपादितसाप्ताहिक भागीदार चा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म महोत्सव विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मार्गदर्शक लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संवाददाता प्रा. गजेंद्र गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले मुकनायक, बहिष्कृत भारत,जनता, समता, प्रबुद्ध भारत या वृत्त पत्राची माहिती देऊन या बाबासाहेबांच्या पत्रकारितेमूळे जनतेच्या विचारात झालेले वैचारिक परिवर्तन व त्यामुळे उभे राहिलेले लोकलढे याची महिती देऊन आंबेडकऱी चळवळीचा पत्रकार दिन म्हणजे आजचा ३१ जानेवारी मुकनायक वर्धापन दिन आहे असे विचार व्यक्त केले. यनिमित्ताने पत्रकार रणजितसिंग राजपूत, प्रा, सुभाष लहाने, मृणाल साळवे, डॉ. उर्मिला ठाकरे यांचे सह कार्यक्रमाचे उदघाटक तथा अध्यक्ष देशोन्नती संपादक प्रकाश पोहरे यांनी बाबासाहेबांची पत्रकारिता व चळवळ या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक प्रा.भाष्कर इंगळे यांनी केले तर विलास सोनुने यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हाभरातून अनेक मान्यवर, पत्रकार, संस्था, संघटना प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थितीत होते.


