
मोताळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील न्हावी शिवारातील गट क्रमांक 136 मध्ये असलेल्या विठ्ठल गोविंदा लहासे यांच्या शेतामध्ये विहिरीतून पाणी उपसण्यासाठी बसविण्यात आलेल्या सौर पॅनलचे रात्रीच्या वेळी अचानक मोठा वारा आला,आणि वाऱ्यामुळे सौर पॅनेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना दि. 27 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे सौर पॅनेलच्या शेजारील झाडाची मोठी फांदी सौर पॅनलवर तुटून आदळली आणि त्यात सौर पॅनल पूर्णतः फुटून निकामी झाले असून शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
सौर पॅनलवर शेतीची सिंचन व्यवस्था असल्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सौर पंप हा शासनाच्या योजनेंतर्गत बसविण्यात आलेला होता या नुकसानीमुळे संबंधित विभागाकडून पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी विठ्ठल लहासे यांनी केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सौर पॅनलसह अन्य शेतउपयोगी साधनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .


