
बुलडाणा (प्रतिनिधी)
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा–उदयनगर मार्गावरील वरवंड–बाळापूर रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून संथगतीने सुरू असताना, उदयनगर ते वरवंड रस्त्यावरील टाकरखेड हेलगा येथील महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाचा मुहूर्त मात्र अद्याप निघालेला नाही. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर पुलालगत नाली बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून, नाल्याचे पाणी थेट पुलावर येत आहे. त्यामुळे पुलावर कायमस्वरूपी चिखल साचलेला असतो. याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, दररोज एक-दोन दुचाकीस्वार घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. अनेकांना शारीरिक इजा होत असतानाही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे जणू नेहमीचेच समीकरण बनले आहे. रस्त्यावर अक्षरशः मोठमोठे खड्डे पडलेले असून, उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होणे सर्वश्रुत आहे. हे वास्तव सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच प्रशासनालाही माहिती असतानाही, दुरुस्तीची ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “नागरिकांचा नाहक बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवालही नागरिकांमधून होत आहे.
उदयनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेड हेलगा गावाजवळील हा पूल अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वारंवार रस्ते उखडतात व खड्डे निर्माण होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पुलावरून जाताना अपघाताचा कायमस्वरूपी धोका असल्याने बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी व मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून केली जात आहे.


