
चिखली (प्रतिनिधी) : चिखली तालुक्यातील करवंड गावातील नागरी वस्ती लगत असलेल्या दलित वस्तीतील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
उन्हाळा गेला, पावसाळा गेला तरीही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यावर केवळ मुरूमाचे ढिगारे टाकून ग्रामपंचायतीने वेळ मारून नेली आहे. टाकलेला मुरूम आणि मोठमोठ्या गिट्ट्या रस्त्यावरच पसरल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना, लहान मुलांना आणि वृद्धांना चालणेही मुश्किल झाले आहे.
अक्षरशः तीक्ष्ण गिट्टी पायात रुतून अनेक नागरिकांच्या पायाला दुखापत झाल्याचे नागरिकांनी सांगितले. शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि महिलांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते.
याबाबत ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत एकाही पत्राची दखल घेण्यात आलेली नाही. सहा महिने उलटून गेले तरी रस्ता जैसे-थेच आहे.
ग्रामपंचायतीच्या या निष्क्रिय कारभाराविरोधात येथील काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली असून रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
करवंड येथील ग्राम विकास अधिकारी यांना फोन कॉल केले , त्यांनी फोन कॉल उचलण्यास टाळाटाळ केली आहे हे विशेष
दुसरीकडे गट विकास अधिकारी यांचे देखील या खेड्यागावातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी दलित वस्तीतील नागरिकांनी केली आहे.


