जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनभिज्ञ की त्यांची डोळेझाक?

चिखली / प्रतिनिधी
माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वैदुवाडी येथे गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे सदर घोळ हा दाबण्यात आला आहे की जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणी डोळेझाक करीत आहेत यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शाळेतील घटलेली विद्यार्थी पटसंख्या व पालकांनी मुलांना अन्य शाळेत हलविल्याच्या पार्श्वभूमीवर, यापूर्वी मुख्यकार्यकारी अधिकारी खरात यांनी 10 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांना शैक्षणिक कामकाज असमाधानकारक ठरवून निलंबित करण्याचा ठोस निर्णय घेतला होता. या निर्णयाची संपूर्ण शासनस्तरावर प्रशंसा झाली होती. असे असतानाच वैदुवाडी येथील जि. प. शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक रामेश्वर गणपत मिसाळ यांनी वर्ग 1 ते 4 साठी कागदोपत्री 8 विद्यार्थी दाखवले; मात्र प्रत्यक्षात हे विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्याचे उघड झाले आहे. संबंधित विद्यार्थी हे नियमितपणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेळगाव आटोळ येथे शिक्षण घेत असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावावर गणवेश, बूट-सॉक्स, शालेय पोषण आहार व पुस्तके यांची अनुदाने उचलून, वाटप झाल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही बाब काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर गठित चौकशी समितीने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते. चौकशी अधिकारी यांनी दि. 02/01/2026 रोजी अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी संपूर्ण चौकशी अहवालासह मिसाळ यांना दोषी धरून शालेय कामकाजातील अनियमिततेचा अहवाल दि. 05/01/2026 रोजी मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. बुलढाणा यांच्याकडे सादर केला असल्याचे नमूद आहे. मात्र, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी हा चौकशी अहवाल मा. मुख्यकार्यकारी अधिकारी खरात यांच्याकडे सादर न करता आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरण दाबल्याची चर्चा चिखली परिसरात सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. तसेच श्री. मिसाळ यांनी सेवाकाळात नियमबाह्य अर्जित रजा व आजारी रजा वारंवार घेतल्या, शाळेवर प्रत्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पगार काढल्याचे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व बाबी माहिती असूनही शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संबंधित मुख्याध्यापकांना पाठीशी घातल्याचा आरोप आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांचा दृष्टिकोन बदलत असताना, आर्थिकदृष्ट्या सक्षम शिक्षकांना संरक्षण देणे आणि इतर प्रामाणिक शिक्षकांवर कारवाई करणे, असा दुजाभाव होत असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. दरम्यान, संदर्भीय कागदपत्रांनुसार रामेश्वर गणपत मिसाळ तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून भा.दं.वि. कलम 420 सह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 20/02/2026 पासून चिखली पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, तसेच त्यानंतर दिवाणी व जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फौजदारी प्रकरण दाखल करण्यात येईल, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.



whjksirlkoygikoxeuemswjhgnotpw
phvpqryjeshjoufyofjmgsldhhwnqw