mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Friends, change the society! : दोस्तो, समाज को बदल डालो !

आज आपण अत्यंत भयग्रस्त आणि चिंताजनक अशा वर्तमानातून वाटचाल करीत आहोत. जिव मुठीत धरुन जगावं अशी आजची परिस्थिती आहे. आपला भवताल वारा प्यायलेल्या वासरासारखा चौखूर उधळला आहे. सैराट सुटला आहे. आणि सैराटचा शेवट कसा निघृण असतो, हे आपण साऱ्यांनीच अनुभवलं आहे. या बेभान परिस्थितीला कुणी आवरेल अशी शक्यताही दिसत नाही. भयंकर अशा चक्रव्युहात आपण सारेच सापडलो आहोत.

 

बुलढाणा : 22 नोव्हेंबर 2025 वार शनिवार ,जागतिक बौद्ध धम्म परिषद बुलढाणा , धम्मविचारापीठावरून मी नारायणराव जाधव येळगावकर बोलतोय

आज आपण अत्यंत भयग्रस्त आणि चिंताजनक अशा वर्तमानातून वाटचाल करीत आहोत. जिव मुठीत धरुन जगावं अशी आजची परिस्थिती आहे. आपला भवताल वारा प्यायलेल्या वासरासारखा चौखूर उधळला आहे. सैराट सुटला आहे. आणि सैराटचा शेवट कसा निघृण असतो, हे आपण साऱ्यांनीच अनुभवलं आहे. या बेभान परिस्थितीला कुणी आवरेल अशी शक्यताही दिसत नाही. भयंकर अशा चक्रव्युहात आपण सारेच सापडलो आहोत.
भयग्रस्तता आज जी निर्माण झाली आहे, ती गाव, जिल्हा राज्यापुरती सिमीत आहे असे नाही. ती देशभर नव्हे जगभर आहे. अमेरिकासारखा देशही त्यातून सुटला नाही. २०२० मध्ये कोरोना सारख्या आजाराने साऱ्या जगालाच आपल्या विळख्यात घेतले होते, तसेच या भयग्रस्त वातावरणाने साऱ्या जगाला जबड्यात जखडून टाकलं आहे. हा जो काळोख दाटला आहे, तो कोरोना सारखा निसर्ग निर्मित नाही. तर जगातल्याच काही स्वार्थी, सत्तालोलुप ,विकृत अशा नेतृत्वानेच अर्थात मानवानेच निर्माण केला आहे.

विकृत व्यवस्थेन वंचित, शोषित समाजासाठी, शिक्षणाची दारेच बंद करुन टाकली आहेत. ” सारे अनर्थ एका अविद्येने केले” असे तेव्हा फुले म्हणाले होते, फुल्यांना अभिप्रेत तेच अनर्थ आज आपल्या बोकांडी बसविण्यात येत आहेत. शाळा-कॉलेजेस मोडकळीस आणली आहेत. प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. कुणी शिकायलाच नको अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. ४० ते ६० % सरकारी पद रिक्त असतांना नोकर भरती बंद आहे. त्या जागी कंत्राटी कामगारांची तात्पुरती नियुक्ती करुन, कंत्राटी कामगारांचे गुलाम तयार करण्यात येत आहेत. बांधवानो, शासकीय नोकरीमुळे केवळ उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत नसतो तर त्या पदामुळे व्यक्तीला काही अधिकार आणि प्रतिष्ठाही प्राप्त होत असते. नोकरी बरोबरच ते अधिकार आणि प्रतिष्ठाही आपल्या हातून छिनून घेतली जात आहे.
ज्या शाहु फुल्यांनी तळागळातील घटकांच्या उत्थानाचा मार्ग मोकळा केला, त्याच शाहु-फुले-आंबेडकरांचे नाव घेत शोषित वंचितांना भणंग भिकारी परजिवी करुन नागविण्यात येत आहे.

स्त्रीयांवर होणारे अन्याय-अत्याचार बलात्कार-खून इतक्या पराकोटीला पोहोचले आहेत की, त्याचं कुणाल कस काही वाटत नाही . रोज मढे त्यास कोण रडे अशी आज आपली शोचनिय अवस्था झाली आहे.
गुंडगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, हिंसाचार यांना उत आलाय. त्याचा नायनाट करण्याऐवजी त्याला संरक्षण देण्यात येत आहे.
महागाईच्या भस्मासूरानं जीना हराम कर दिया है।,पराकोटीची धर्मांधता मॉब लिचिंग यांच्या भयंकर दहशतीखाली आपण गुदमरुन मरुन जातो की काय? अशी भिती वाटायला लागली आहे.

बेशुमार बेकारी वाढली असून काम नाही धाम नाही, रोजी नाही, रोटी नाही. यामुळे तरुणामध्ये प्रचंड नैराश्य निर्माण करुन उन्हे, खोकला बनाया जा रहा है।
त्यातुनच व्यसनाधिनता गाजर गवतासारखी फोफावली आहे. त्यामुळे आजचा तरुण वर्ग दारु-गांज्या ,अमंली पदार्थाच्या पुर्णतः आहारी गेला आहे. आपल भविष्य म्हणजे नुसता काळोख आहे. आपण वाढलो, पण मायबापाचे आधार होऊ शकलो नाही, या विचारानं ते स्वतःच्या जीवाला खात आहेत आणि हे दुःख गिळण्यासाठी आणखी वरुन पित आहेत.

मंडळी हाताला काम नसल्यामुळे तरुण वर्ग व्यसनाकडे वळला आहे. हे आपण समजू शकतो. पण आंबेडकरी तरुणांना षडयंत्र रचुन व्यसनाच्या नादी लावण्याचा जो घाट घातल्या जात आहे, ते भयंकर आहे !

आजचा युवक मादक द्रव्यात अहोरात्र बुडालेला असावा, सतत तर्रर असावा, त्यातच त्याची बुध्दी, शक्ती, वेळ खर्ची पडावी, त्याला सकारात्मक विचार करायला सवडच सापडू नये अशी पध्दतशीर आखणी करण्यात येत आहे.

मागच्या होळी आणि रंगपंचमी या दोन दिवशी काही भागात एक खास व्यवस्था करण्यात आली. आंबेडकरी वस्त्यातील तरुणांना गोळा करुन त्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले आणि प्रत्येक ग्रुपवर दारु, मटन, गांजा अशा नशिली पदार्थाचा त्यांचेवर लयलूट करण्यात आली. मस्त, पैश करो असे उत्तजेन देण्यात आले. वेगवेगळ्या ग्रुपनी वेगवेगळ्या ठिकाणी अशी ऐश करुन रंगपंचमीचे रंग उडविले.

त्यानंतर असा पायंडाच पाडण्याचे आता प्रयास सुरु आहेत. महिन्या दोन महिन्यावरुन पार्ट्याचे आयोजन करुन आंबेडकरी तरुणांना दारु-गांज्याच्या नशेत बुडवुन ठेवण्याचे काम सुरु आहे. तुमच्या ठायी असलेल्या आंबेडकरी युवा शक्तीची नसबंदी करण्याचा एक नवाच मार्ग त्यांनी आता शोधून काढला आहे.

मात्र मुस्लिम वस्त्यातील तरुण पोरं या अज्ञात व्यवस्थेच्या सापळ्यात सापडत नाहीत ही त्यांची खंत आहे.

युवा मित्रांनो, तुमच्यातील युवाशक्ती नाकाम, गुलाम, लाचार बनविण्याचं हे एक षडयंत्र आहे. तुम्हाला रचनात्मक चिंतन-मनन करण्याची सवडच सापडू नये, दारुच्या घोटासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही लाचार होऊन त्यांच्या दाराशी चोविस तास पडून असावे हा त्यांचा डाव आहे.

आपण सावध-सजग असावं ,या षडयंत्राला बळी पडू नका. त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहू नका. लोकशाहीवरच गंडांतर आणि संविधान धोक्यात आले आहे.

या देशात लोकशाही टिकेल का?

या देशात लोकशाही टिकेल का? असा प्रश्न काही लोक दबक्या आवाजात तर काही लोक जाहीरपणे विचारु लागली आहेत. नेमका हाच प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५२ मध्ये एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर बाबासाहेब म्हणाले होते, या देशातील विविध राजकीय पक्ष भविष्यात कसे वागतात, त्यावर ते अवलंबून असेल. भविष्यात येथील राजकीय पक्ष, आपल्या पक्षाला देशापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठे मानतात की, देश आपल्या पक्षापेक्षा मोठा आहे असे समजतात, यावर ते अवलंबून असेल.

आज आपल्या देशात नेमकी हिच परिस्थिती उद्भवली आहे. येथील विविध राजकीय पक्ष आपला पक्ष देशापेक्षाही किंबहूना संविधानापेक्षा मोठा आहे, असे समजत आहेत. संविधानिक नितिमत्ता धाब्यावर बसवून तोडफोडीच्या राजकारणाला संरक्षण देत आहेत. कशाचाही विधि निषेध न बाळगता, आपल्याच पक्षाच्या हाती सत्ता चिरकाल कशी राहील यासाठी वाट्टेल त्या करामती केल्या जात आहेत. त्यासाठी मतदारांना ऐन निवडणूकीच्या तोंडावर विविध प्रकारची आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होत आहेत. निवडणूक आयोगही त्याला साथ देत आहे. लोकशाही व्यवस्थेवर हे फार मोठे संकट आहे. दिशाभूल, लबाडी, फसवणूक हे लोकशाहीचे अधिष्ठाण होऊ शकत नाही. न्याय आणि राजकीय नितिमत्ता हे खरे लोकशाहीचे अधिष्ठाण होय आणि तेच आज उध्वस्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली असून युवकांनी तिचा बचाव करण्यासाठी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. बांगलादेश, नेपाळ येथे असाच अन्याय-अत्याचार शिगेला पोहोचला होता. तेव्हा तेथील युवक रस्त्यावर उतरला. भारतातील युवकांनी आता असेच पेटून उठले पाहिजे.

समाज को बदल डालो ! येथील व्यवस्था बदलायची असेल तर आता ” समाज को बदल डालो” हा नारा बुलंद करावा लागेल. कारण साऱ्याच गोष्टी आता स्वार्थाने भ्रष्टाचाराने बरबटून गेल्या आहेत. पोखरल्या, गरीबीने त्रस्त झालेल्या, दबलेल्या लोकांना तात्कालिक लाच देवून भ्रष्ट करीत आहेत. लाचारी-गरीबीने त्रस्त झालेला समाज आता विचार-विवेक गमावून बसला आहे. ” मरता क्या नही करता ” असे म्हणतात. आपल्या देशात आज तेच घडत आहेत. यावर मात करायची असेल तर एक सत्वशिल, नितिमान, विवेकी आणि चारित्र्यवान समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. ते फक्त युवाशक्तीच करु शकेल.

मला वाटते सतीश पवार सारखा खमक्या युवा कार्यकर्ता ज्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करीत आहे. त्या परिषदा समाज को बदल डालो, या मोहिमेचा प्रारंभ आहे !

शाक्य संघाची लोकशाही समाज बदलायचा हे ठिक आहे. पण तो हिंसाचारातून वा रक्तपातातून नाही. तो सनदशिर मार्गानेच बदलायचा आहे. रक्तपाताशिवाय घडवून आणलेली क्रांती ही तर बाबासाहेबांनी लोकशाहीची केलेली व्याख्याच आहे . मात्र आजचा समाज बदलायचा कसा या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला अडीच हजार वर्षापूर्वीच्या शाक्यांच्या समाज व्यवस्थेकडे जावे लागेल. कपिलवस्लू नगरीचे जे राज्य होते, तिथे लोकशाही नांदत होती. ती संसदीय लोकशाही होती. त्या लोकशाहीचा पाया होता समाजाचा शाक्य संघ. हा शाक्यसंघ प्रथम सामाजिक होता तसा तो राजकीय ही होता.
समाजातील प्रत्येक युवक वयाने विस वर्षाचा झाला की त्याला शाक्य संघाचा सभासद होणे अनिवार्य असे. संघाचा सभासद होण्यासाठी त्याला काही अटी शर्तीची दीक्षा घ्यावी लागत असे.
खोटे बोलण्यास प्रतिबंध होता.,तो हिंसेपासून मुक्त असणे अनिवार्य होते. त्याला चोरी करण्यास प्रतिबंध होता. व्याभीचार गंभीर अक्षम्य गुन्हा मानले जात असे.
समाजातील प्रत्येक युवक या अटी-शर्तीच काटेकोर पालन करीत असल्यामुळे एक नितिमान आणि चारित्र्यसंपन्न असा शाक्यांचा समाज होता. तो कोणत्याही आमिषाला बळी पडत नसे. असा समाजच त्यांच्या लोकशाहीचा कणा होता.

आपल्याला अशा चारित्र्यवान युवकांची फौज निर्माण करुन वर्तमान लोकशाहीचा पाया भक्कम करावा लागेल.
आजचा आपला लोकशाहीचा पायाच ठिसूळ आहे. कमकुवत आहे. १८ वर्ष पुर्ण झालेल्या कोणत्याही युवा-युवतीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात येतो. त्याची पात्रता तपासली जात नाही. फक्त वयाची काय ती अट असते. आपल्याला समाजात नितिवान आणि शिलसंपन्न युवावर्ग तयार करावा लागेल. जो कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही.
त्यासाठी आपल्याला शाक्य संघाच्या धर्तीवर तरुण तरुणींचे सिध्दार्थ संघ, यशोधरा संघ तयार करावे लागतील. सतीश पवार याची चळवळ त्याच दिशेने वाटचाल करतांना दिसत आहे.

उद्योगधंद्याची जोड द्या !

समाजात सन्मानाने जगु पाहणारी कोणतीही व्यक्ती आत्मनिर्भर असेल, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असेल तर ती कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही. आजचा तरुण, बेकार आहे, बेरोजगार आहे. पै-पै साठी तो तरसत आहे. म्हणूनच तो आमिषाला लगेचच बळी पडतो. शुद्र स्वार्थासाठी विकल्या जातो. हे थांबवायचं असेल तर त्याच्या हाताला काम आणि त्याच्या घामाला दाम द्यावं लागेल. या धम्म परिषदेच्या निमित्ताने जी उद्योग प्रदर्शनी भरविली आहे. त्यामागे सतीशची हीच दूरदृष्टी आहे.

तरुणांनो, तुम्ही त्याचा फायदा घ्या. त्यासाठी भांडवल लागेल. छोट्या-छोट्या भांडवलापासून सुरुवात करा.
त्यासाठी तरुण-तरुणींनी बचत गटाची स्थापना करावी. त्यातुन भांडवल उभे करा. महिला बचत गटांनी Self help Grup करुन प्रचंड क्रांती केली आहे. तुम्हीही स्वतःचे आर्थिक आधारस्तंभ व्हा! अशा बचत गटांना बँकाही मदत करतात.

स्वयंप्रकाशित व्हा ! त्यासाठी स्वयंप्रकाशित व्हा. आपल्या अक्कल हुशारीने काम करा. कुणाचे गुलाम होऊ नका. सुदैवाने तुम्हाला सतीश पवार सारखा प्रज्ञावान, हरहुन्नरी, कल्पक आणि धाडसी असा मार्गदर्शक मित्र लाभला आहे. त्याने दाखविलेल्या दिशेने मार्गक्रमण करा. जग बदलण्याची, समाज बदलण्याची धमक तुमच्यात आहे. जगातील महान क्रांत्या युवकांनीच केल्या आहेत. फ्रेंच राज्यक्रांती त्याची साक्ष देते.

धम्माचे प्रयोजन काय? Reconstruction of the World. आपल्यालाही तेच करायच आहे. समाजाची पुर्णबांधणी करायची आहे.
आजची ही धम्म परिषद त्या परिवर्तनाचे पहिले पाऊल आहे. चला याच मार्गाने मार्गक्रमण करा. निर्धाराने चला. यश तुमचेच आहे.

*नारायण जाधव येळगांवकर
*ज्येष्ठ साहित्यिक
९४२२९४१६४९

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top