
मेहकर( प्रतिनिधी): शहरातील हिंदू स्मशानभूमीजवळ मुख्य पाणीपुरवठा करणारी पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. घटना घडून ५ तास उलटले तरी नगरपरिषदेचा एकही कर्मचारी अथवा जबाबदार पदाधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
“पाणी जपून वापरा” म्हणणारे कुठे?
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पाणी जपून वापरा’ असे आवाहन करणारे नगराध्यक्ष व नगरसेवक मात्र प्रत्यक्षात पाणी वाया जात असताना गायब असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहरात अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांना तहान भागवावी लागत असताना, दुसरीकडे मुख्य जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे, हे दुर्दैवी चित्र आहे.
स्थानिक रहिवासी म्हणाले, “आम्हाला दिवसाआड पाणी येते. टँकर लावून पाणी भरावे लागते. आणि इथे ५ तासांपासून पाणी नुसते वाहतेय. नगरपरिषदेला फोन करूनही कोणी दखल घेतली नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक कुठे आहेत?”
घटनास्थळी पाणी वाहत व असून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. या हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पण ५ तासापासून पाणी वाहत आहे.कोणीच आले नाही. प्रशासन इतके निर्दयी कसे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गळती थांबवावी व पाण्याची नासाडी रोखावी, अशी मागणी जोर धरत आहे.
