भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांचे संघटन बळकटीकरणावर मार्गदर्शन: राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते उद्घाटन

बुलढाणा (प्रतिनिधी): बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, जिल्हा कार्यकारिणी बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, दि. २७ मे २०२६ रोजी शहरातील बस स्टँड रोडवरील हॉटेल जिमखाना हॉल येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला जिल्हाभरातील बहुजन समाजातील कर्मचारी, नोकरदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी संघटनात्मक एकजूट, कर्मचारी हितसंरक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘बहुजन समाजातील कर्मचार्यांनी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहून संघटित चळवळ मजबूत करणे आवश्यक आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बी.ई.एफ.चे राज्य सचिव सिद्धार्थ सुमन यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कर्मचारी वर्गासमोरील विविध प्रशासकीय अडचणी, सेवा विषयक प्रश्न, संघटनात्मक बांधणी, तसेच संविधानिक अधिकार यावर सखोल माहिती दिली. संघटित शक्तीच्या माध्यमातूनच कर्मचार्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनीही उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात सामाजिक परिवर्तनासाठी संघटनात्मक बळाची गरज अधोरेखित करताना सांगितले की, ‘संघटन मजबूत करणे आणि चळवळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे. बहुजन समाजातील नोकरदारांनी सामाजिक जाणीव ठेवून समाजाच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.’ या प्रशिक्षण शिबिरामध्ये कर्मचारी वर्गाच्या न्याय्य मागण्या, शासकीय धोरणांचा परिणाम, संघटन विस्तार, सामाजिक नेतृत्व निर्मिती आणि बहुजन चळवळीच्या आगामी दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी विविध विषयांवर मते मांडत संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत सूचना देखील केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर गवई यांनी केले. प्रस्तावना अजय कुमार पडघाण यांनी मांडली, तर प्रा. कडुबा पैठणे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
