दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

चिखली (प्रतिनिधी)
जिथे मराठी बोलली जाते तिथे महाराष्ट्र जिवंत राहत असतो. मराठी केवळ भाषा नाही तर ती आपली ओळख आहे. ती आपली संस्कृती आहे. नवव्या शतकापासून मराठी भाषा आपल्या सोबत आहे. मुकुंदराज पासून संत तुकाराम आणि मोरोपंतापर्यंत अनेक थोरामोठ्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा आणि साहित्यभाषेचे रूप दिले आहे. म्हणून तिचा जागर झाला पाहिजे. कारण मराठी भाषा टिकली तरच मराठी संस्कृती टिकेल असे प्रतिपादन मेहकर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ.सुनील पवार यांनी केले.
चिखली येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व सांगताना डॉ. सुनील पवार बोलत होते, पुढे बोलताना त्यांनी मराठी भाषेसमोरील आव्हाने सांगून मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच घरी, मित्रासोबत, कार्यालयामध्ये मराठीत बोलावे. मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे, दिवाळी अंक वाचावेत तसेच मराठी नाटके, गाणी बघावीत असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश खान साहेब होते, तर न्यायाधीश स्मिता उके, न्यायाधीश मेघा पौळ, चिखली वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाला विधीज्ञ, पक्षकार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुनीता जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन ॲड. बी. सी. वानखडे यांनी केले.


