
चिखली (प्रतिनिधी): तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव जितु निकाळजे यांच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाल्यानिमित्त “ही रात्र शाहिरांची” हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुधवार दि. 9 जुलै 2026 रोजी रात्री झालेल्या या कार्यक्रमात बुद्ध, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरील गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
जितु निकाळजे यांना सोमवार दि. 29 जून 2026, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. नामकरण सोहळ्याचे औचित्य साधून त्यांनी गावात समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला.
शाहिरांच्या गीतांनी गाजले साकेगाव
या कार्यक्रमात डॉ. शेवली, शाहीर राहूल गवई संच कोलारा, शाहीर भीमराव खंडारे संच मंगरूळ न., शिवाजी लहाने, विजय पवार नायगाव, शाहीर विश्वानाथ घेवंदे, खोर शाहीर संजय मोरे संच कोनड खुर्द, शाहीर परमेश्वर वानखेडे व संच वाघापूर, गुलाबराव साळवे व संच आणि साकेगावच्या महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला.
शाहिरांनी सादर केलेल्या गीतांमधून सामाजिक समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा संदेश देण्यात आला. सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरही शाहिरांनी आपल्या पोवाडे आणि भारुडांमधून भाष्य केले. शाहिरांच्या सादरीकरणाला गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
महापुरुषांचा विचार नव्या पिढीपर्यंत
कार्यक्रमादरम्यान संपूर्ण साकेगाव गावकरी शाहिरांच्या गीतांचा आनंद घेत होते. जितु निकाळजे यांचे कुटुंबीय, आई-वडील, काका-काकू, आत्या, मामा यांच्यासह गावातील असंख्य महिला-पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित “ही रात्र शाहिरांची” या कार्यक्रमामुळे साकेगावमध्ये बहुजन महापुरुषांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, अशी चर्चा गावात आहे.
