
बुलडाणा/ प्रतिनिधी
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना स्थान नसून केवळ उद्योगपतींचे भले करणारा हा अर्थसंकल्प आहे असा आरोप भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे. तसेच शेतकर्यांचा तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अर्थसंकल्पावर भाष्य करताना पवार म्हणाले की, अर्थसंकल्प २०२६ हा सुशिक्षित बेरोजगार, कष्टकरी कामगार व शेतकर्यांना निराश करणारा आहे. दुर्दैवाने या अर्थसंकल्पात महागाईसह खाजगीकरण नियंत्रणाबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असून, त्यात सुशिक्षित बेरोजगार, कष्टकरी कामगार व शेतकर्यांच्या हिताचा अभाव असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्पात मोठ्या व्यापार्यांना फायदा होईल अशा घोषणांचा समावेश असल्याचे मत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी व्यक्त केले आहे. ‘सुशिक्षित बेरोजगार, कष्टकरी कामगार व शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ मोठ्या व्यापार्यांचे चांगभले आहे,’ अशी देखील प्रतिक्रिया सतीश पवार यांनी व्यक्त केली.


