mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Financial literacy training workshop in Waghapur to raise financial awareness among rural citizens :वाघापूर येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे ग्रामीण नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकतेचा जागर

चिखली/प्रतिनिधी

भारतीय रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कार्यरत मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र, बुलढाणा तसेच इंडियन ओव्हरसीज बँक, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाघापूर (ता. चिखली) येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा अत्यंत उत्स्फूर्त वातावरणात पार पडली असून ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.

या कार्यशाळेस RBI नागपूर येथील LDO (लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर) सर्वज्ञ सिंग सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण नागरिकांसाठी वित्तीय साक्षरतेचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. बँकिंग व्यवहार हे केवळ पैसे जमा-काढण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक, विमा व पेन्शन योजनांचा लाभ घेणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेदरम्यान बँक खाते उघडण्याची प्रक्रिया, आधार-पॅन लिंकिंग, डिजिटल पेमेंट पद्धती (UPI, ATM, मोबाइल बँकिंग), विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच शासन व बँकांच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणूक कशी ओळखावी व त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र, बुलढाणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना केंद्र समन्वयक वैभव डांगे यांनी ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता पोहोचविण्यात बँक सखी, बचत गट व CRP यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

यावेळी अकोला विभागाचे एरिया मॅनेजर आकाश मेहेत्रे सर यांनी मार्गदर्शन करताना अशा वित्तीय साक्षरता उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे नमूद केले. तसेच क्षेत्र समन्वयक शोधक मोरे यांनी प्रशिक्षणाच्या आयोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

या कार्यशाळेस बँक सखी दिपाली साळवे, बचत गट CRP संगीता ठेंग, ग्रामसंघ अध्यक्ष स्वप्नाली साळवे, महिला बचत गट सदस्य, तसेच  माजी सरपंच सौ वर्षा विठ्ठल गिरी, सरपंच सुभाष ठेंग,उपसरपंच समाधान मोरे , संतोष बिथरे व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वित्तीय विषयांवरील प्रश्न विचारले. उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना व्यवहारिक उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या शेवटी नागरिकांना विविध वित्तीय योजनांची माहितीपत्रके वितरित करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढून ते आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित राहतील तसेच शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला.

सदर कार्यशाळा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली असून भविष्यातही अशा वित्तीय साक्षरता उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top