
बुलढाणा, दि. 11 (प्रतिनिधी): भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही UPU (युनिव्हर्सल पोस्टल युनियन) आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मित्र किंवा मैत्रिणीला पत्र लिहून आपल्या भावना व विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचा विषय “डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत” असा ठेवण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी या विषयावर पत्रलेखन करायचे आहे. ९ ते १५ वयोगटातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र आहेत.
ही स्पर्धा ०८ मार्च २०२६ (रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच शालेय स्तरावरील स्पर्धा ०७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी होणार आहे.
पत्र इंग्लिश किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचित असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहिता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत आपले मत मांडण्याची मुभा असून, कमाल शब्दमर्यादा ८०० शब्द इतकी आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधीक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा येथे जमा करावेत. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सर्कल स्तरावरील बक्षिसे :
प्रथम — रु. २५,००० व प्रमाणपत्र, द्वितीय — रु. १०,००० व प्रमाणपत्र , तृतीय — रु. ५,००० व प्रमाणपत्र
राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे :
प्रथम — रु. ५०,००० व प्रमाणपत्र, द्वितीय — रु. २५,००० व प्रमाणपत्र , तृतीय — रु. १०,००० व प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण व्हावी व सर्जनशील लेखनाला चालना मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश आंभोरे, अधीक्षक डाकघर, बुलडाणा विभाग यांनी केले आहे.


