महिलेचा संसार उघड्यावर; चिखली तालुक्यातील खैरव येथील संतापजनक प्रकार

चिखली / प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील खैरव येथे ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी कथितरित्या जातीय पूर्वग्रहातून एका बौद्ध महिलेचे राहते घर जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याची धक्कादायक घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली. या कारवाईमुळे संबंधित महिलेचा संसार अक्षरशः उघड्यावर आला असून गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. खैरव येथील रहिवासी पंचफुला शेषराव अंभोरे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्या खाजगी दवाखान्यात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे टिनपत्राचे छोटेसे घर असून त्यात बकऱ्या, खाद्यसामग्री, कपडे व इतर घरगुती साहित्य साठवलेले होते.मात्र गावातील रस्त्याच्या कामाच्या कारणावरून ग्रामपंचायतीकडून त्यांना घर हटवण्याची नोटीस बजावण्यात आली. संबंधित महिलेने गटविकास अधिकारी व पोलिस ठाण्याकडे लेखी अर्ज देत, ‘रस्ता करायचा असल्यास शेजारील इतर घरांनाही नोटीस द्यावी,’ अशी मागणी केली होती. परंतु तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून इतर कोणालाही नोटीस न देता केवळ तिच्याच घरावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. २८ फेब्रुवारी रोजी महिला कामानिमित्त चिखली येथे असताना गावात जेसीबी मशीन आणून तिच्या राहत्या घरावर कारवाई करण्यात आली. महिला घरी परत येईपर्यंत संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आले होते.
पिण्याच्या पाण्याचा नळ तोडण्यात आला, घरातील कपडे व अन्नसामग्री उघड्यावर फेकण्यात आली, तर टिनपत्रे व लोखंडी अँगल ट्रॅक्टरमध्ये भरून नेण्यात आल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर उध्वस्त झालेले घर पाहून महिलेने आक्रोश केला. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र रोष पसरला आहे. सदर महिलेने न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई करतात, की पीडित महिलेचा संसार उघड्यावरच राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


