
बुलडाणा(मूकनायक वार्ता) : 4 जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने चौका-चौकात झळकणारे मोठमोठे बॅनर, जाहिराती आणि हार-तुरे यावर होणारा हजारोंचा खर्च टाळून, सावकारीच्या पाशात अडकलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा स्तुत्य संकल्प भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा बिघडता समतोल लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
नेमका निर्णय काय?
सतीश पवार यांचा वाढदिवस जवळ येत असताना कार्यकर्त्यांनी बॅनर, फ्लेक्स लावण्याची तयारी सुरू केली होती. मात्र पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या वाढदिवसासाठी एकही रुपया बॅनरवर खर्च करू नका. तोच पैसा जिल्ह्यातील सावकारी कर्जाने त्रस्त असलेल्या, आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरा. सोबतच प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 5 झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घ्यावी.”
पेरणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी केवळ पैसे अभावी बी-बियाणे, खते खरेदी न करता आल्याने अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना सतीश पवार यांच्या या उपक्रमाचा थेट लाभ होणार आहे. बॅनरवर होणाऱ्या खर्चातून जमा होणाऱ्या निधीतून या शेतकऱ्यांना तातडीने कापूस व सोयाबीनचे बियाणे आणि खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जेणेकरून त्यांची पेरणी वेळेत होऊ शकेल.
वृक्षलागवडीवर भर
“आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ याचा फटका थेट शेतकऱ्याला बसतो. त्यामुळे फक्त बॅनर न लावता, त्याच पैशातून गावोगावी, सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ, कडुनिंब यांसारखी देशी झाडे लावा. एक बॅनर लावण्यापेक्षा एक झाड जगवा, हीच माझ्यासाठी खरी भेट असेल,” असे आवाहन पवार यांनी केले.
शेतकऱ्यांची प्रतिष्ठा जपा: फोटोसेशन टाळा
गरजू शेतकऱ्यांना मदत करताना त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही सतीश पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. “मदत करताना कोणत्याही प्रकारे फोटोसेशन, व्हिडीओ करून सोशल मीडियावर टाकून त्या शेतकऱ्याची प्रतिष्ठा मलीन होईल असे कृत्य करू नका. मदत ही गुप्तदान पद्धतीने व्हावी. प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याचा आत्मसन्मान दुखावणे चुकीचे आहे,” अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत.
का घेतला हा निर्णय?
सध्या राज्यात शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळत नाही. सरकारने जाहीर केलेला कापसाचा 8 हजार रुपये हमीभाव असताना बाजारात 6 हजारांवर कापूस विकला जात आहे. सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कर्जमाफीचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या वाढदिवसाला होणारी उधळपट्टी थांबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत व पर्यावरण संवर्धन व्हावे, ही यामागची भावना असल्याचे पवार यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
सतीश पवार यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरचे पैसे जमा करून जिल्ह्यातील 15 ते 20 गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. कापूस-सोयाबीनची पेरणी अडकलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जाणार आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे. सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मदत देण्याचेही नियोजन सुरू आहे.
“कृतीतून आदर्श घालून द्या”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच शोषित, पीडितांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचा अनुयायी म्हणून मिरवायचे असेल तर फक्त बॅनर लावून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून द्यावा लागेल,” असे मत सतीश पवार यांनी व्यक्त केले.
सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत. अशा काळात एका राजकीय नेत्याने स्वतःच्या प्रसिद्धीऐवजी शेतकऱ्यांचा प्रश्न, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला प्राधान्य दिल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.


