वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

उदयनगर (प्रतिनिधी ) दि.19: शिवजयंतीनिमित्त वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे टाकरखेड हेलगा येथे आयोजन करण्यात आले होते. टाळ–मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
शिवप्रतिमेचे पूजन करून वारकरी भाविकांनी अभंग, भजन गजर सादर केले. परिसर भक्तिरसाने भारून टाकला. टाळ–मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा नाद घुमत असताना उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाची आणि आदर्श राज्यकारभाराची आठवण काढली.हा सोहळा शिवशंभो बहुउद्देशीय संस्था, रुद्र शंभो ढोल ताशा पथक यांच्या परिश्रमाने आणि शिवस्मारक समिती यांच्या विविध उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील सर्व जातीधर्मातील महिलांनी प्रत्येक घरासमोर सडा–रांगोळी काढून शिवरायांचे पूजन करत अभिवादन केले. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समानतेच्या विचारांना उजाळा देत सामाजिक ऐक्याचा संदेश यावेळी देण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे सर्व जातीधर्माचे मावळे स्वराज्य उभारणीसाठी एकत्र उभे राहिले, त्याचप्रमाणे या शिवजयंती उत्सवातही सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले


