
बुलढाणा (प्रतिनिधी):अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा चित्र वेगळं आहे. पक्षाच्या झेंड्यांपेक्षा शिक्षकांच्या मनातील उमेदवार म्हणून प्रा. किरण अर्जुन पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतमजूर शेतकरी कुटुंबातून आलेले प्रा. पवार हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकांच्या वेदना काय आहेत, हे चांगलंच ठाऊक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत.
“शिक्षकांसाठी धावणार, प्रश्न मार्गी लावणार”प्रा. पवार यांनी सांगितले की, आज शिक्षक अनेक समस्यांनी त्रस्त आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे,विनाअनुदानित शिक्षकांना 100% अनुदान मिळवून देणे,घड्याळी तासिका / तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करणे आणि सन्मानजनक मानधन मिळवून देणे,हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
“विधान परिषद ही केवळ निवडणूक नसून शिक्षकांच्या हक्क, अधिकार व सन्मानाची लढाई आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी संघर्ष काय असतो ते पाहिले आहे. मी विधान परिषदेत गेलो तर फक्त शिक्षकांच्याच प्रश्नांवर बोलणार. हा माझा शब्द आहे,” असे प्रा. पवार म्हणाले.
पक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या शिक्षकांना आता हक्काचा, आपल्यातलाच एक माणूस विधान परिषदेत हवा आहे. त्यामुळे “शिक्षकांच्या मनातील अपक्ष उमेदवार” म्हणून प्रा. किरण पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.


