
बुलढाणा (प्रतिनिधी) :बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथे धम्मसागर बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना अत्यंत उत्साहात व श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाली. तसेच याच दिवशी धम्मसागर बुद्ध विहाराचे उद्घाटनही पूज्य भंते यांच्या हस्ते करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सकाळी गावातून भव्य धम्म रॅली काढण्यात आली होती. “बुद्धम् शरणम् गच्छामि” च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले. रॅलीत मोठ्या संख्येने उपासक, उपासिका, धम्म बांधव आणि तरुण वर्ग सहभागी झाला होता. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर जेसीबीच्या सहाय्याने रॅलीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
विहाराच्या प्रांगणात कार्यक्रमस्थळी पूज्य भंते यश थेरो आणि पूज्य भंते शांतीचित्त यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजापाठ करून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.
मूर्ती प्रतिस्थापनंतर पूज्य भंते यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली. तथागतांच्या अहिंसा, करुणा, मैत्री आणि समतेच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व पटवून देत, पंचशीलाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माळविहीरसह परिसरातील मोठ्या संख्येने धम्म उपासक, उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन धम्मसागर बुद्ध विहार समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते.
