
बुलढाणा (प्रतिनिधी)दि. 24 मार्च,जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये असलेली नावीन्यपूर्ण उपक्रमशीलता हे एका प्रकारे संशोधनात्मक सृजनशीलतेचे स्वरूप असून या माध्यमातून आगामी नवीन शैक्षणिक सत्रात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच रूप पालटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी व्यक्त केला.
समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक जिल्हा नियोजन सभागृहात झेप – झेडपीज एज्युकेशनल पायोनियर या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 150 नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती गायकवाड, व्याख्याते गजानन राऊत. उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, शेख अकिल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना गुलाब खरात म्हणाले की, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले शिक्षक हे सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच सेवेत रुजू झालेले आहेत. शहरालगतच्या गावांपासून ते दुर्गम भागांपर्यंत विभिन्न स्थानिक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांसमोर विविध आव्हाने उभी ठाकतात. मात्र अशा परिस्थितीतही ते आपली कर्तव्यपरायणता जोपासत असतात. आपले नियमित शैक्षणिक कामकाज करताना विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी या शिक्षकांकडून केली जाते. तथापि अनेक वेळा त्यांच्या या उपक्रमांना शैक्षणिक मंच उपलब्ध होत नाही. शिक्षकांनी त्यांच्या शाळेत सुरू केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम हे एक प्रकारे सृजनशील संशोधनात्मक अभ्यासच असतात. या सृजनशीलतेला बळ मिळावे म्हणून झेडपीज एज्युकेशनल पायोनियर अर्थात झेप या आगळ्या वेगळ्या संकल्पनेची अंमलबजावणी पुढील काळात केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून एका शाळेतील उल्लेखनीय उपक्रम दुसऱ्या शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी. उपक्रमांच्या आदानप्रदानाची एक नवी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून आगामी शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच शिक्षकांना आपले शैक्षणिक कार्य कुठल्याही विवंचनेशिवाय पार पाडता यावे यासाठी प्रशासन हे शिक्षकस्नेही होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल असे सांगून शिक्षकांनी यापुढे आता विद्यार्थीस्नेही होऊन जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जगराम भटकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. तसेच लोणार येथील गजानन राऊत यांनी प्रेरणा विषयाच्या अनुषंगाने उद्बोधन केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील निवडक शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला.



66biolink, I saw it trending and decided to take a look. It’s really useful for my social media. Clean interface, easy to use, and does what it says. Check it here: 66biolink