15 दिवसांपासून थेंबही नाही, वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईनची मागणी; आमदार महालेंकडे ग्रामस्थांचे साकडे

चिखली( प्रतिनिधी): महेंद्र हिवाळे
चिखली तालुक्यातील अंत्री कोळी गावाने पाण्यासाठी अक्षरशः हंबरडा फोडला आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेला पाण्याचा तुटवडा आता भीषण बनला असून, मागील 15 दिवसांपासून गावातील नळाला थेंबभरही पाणी येत नसल्याने संपूर्ण गाव कोरडेठाक पडले आहे.
2 किलोमीटर पायपीट, परक्या विहिरीचा आधार गावात पिण्यापासून ते धुणी-भांड्यापर्यंत पाण्याचा थेंब नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. गावातील महिला-भगिनींना दररोज 2 किलोमीटर पायपीट करत शेतातील, माळरानावरील ‘परक्या’ विहिरी गाठाव्या लागत आहेत. तिथेच कपडे धुऊन, भांडी घासून डोक्यावर हंडे भरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. जनावरे तहानेने व्याकूळ झाली असून, शाळकरी मुलांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत.
“BDO आमच्याच गावचे, तरी वणवण” – ग्रामस्थांचा आक्रोश
आमच्याच गावचे समाधान वाघ हे चिखली पंचायत समितीचे BDO आहेत. गावात सरपंच सुभाष ठेंग यांची प्रशासक समिती आहे. तरीही आम्हाला 2-2 किमी पायपीट करून परक्या विहिरीवर जावे लागते,” अशी व्यथा एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर मांडली. “तीन महिने नळाला कसेबसे पाणी येत होते. पण आता 15 दिवस झाले, नळ पूर्ण कोरडा आहे. थेंबही येत नाही, असेही ते म्हणाले.
कायमस्वरूपी तोडगा: वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईन द्या.
या समस्येवर ग्रामस्थांनीच तोडगा सुचवला आहे. वाघापूर येथील विहिरीला मुबलक पाणी आहे. तिथून अंत्री कोळीपर्यंत तातडीने पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास प्रश्न कायमचा मिटेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना राबवावी, अशी मागणी आहे.
मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी अंत्री कोळीच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तात्काळ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सरपंचांची ग्वाही: याबाबत सरपंच सुभाष ठेंग म्हणाले, “वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू करणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत गावकऱ्यांना पाणी मिळेल.”
गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
