
चिखली, (प्रतिनिधी): चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतात भर उन्हात एका शेळीने शेतातच तीन पिलांना जन्म दिल्याची घटना घडली. पिलांसह शेळी सुखरूप असून, शेतकरी महिलेच्या समयसूचकतेमुळे पिलांचे प्राण वाचले.
लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गरड या शेतकरी महिलेची ही शेळी आहे. गुरुवारी दुपारी लक्ष्मीबाई शेतात काम करत असताना त्यांच्या शेळीला कळा येऊ लागल्या. भर उन्हात शेतातच शेळीने एकामागून एक तीन पिलांना जन्म दिला.
उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आणि जमीन तापलेली असल्याने नवजात पिले दगावण्याची भीती होती. मात्र लक्ष्मीबाईंनी प्रसंगावधान राखत तातडीने साडीचा झोका बांधला. त्या झोक्यात कापड अंथरून तीनही पिले अलगद ठेवली. सावलीत झोक्यामुळे पिले ऊन आणि गरम जमिनीपासून बचावली.
शेळी अचानक शेतातच व्याली. काय करावे सुचेना. पण पिले जगवायची होती. म्हणून साडीचा झोका केला आणि त्यात ठेवली. आता तिन्ही पिले टुणटुणीत आहेत, असे लक्ष्मीबाई गरड यांनी सांगितले.
ग्रामीण भागात पशुपालकांना प्रसूतीदरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र लक्ष्मीबाईंच्या धाडसाचे आणि मायेचे परिसरात कौतुक होत आहे. शेळी आणि तिन्ही पिले सुखरूप असल्याने गरड कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
