25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सतीश पवार

बुलढाणा ( प्रतिनिधी ) : दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथितपणे केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने बुलढाण्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा आझाद समाज पार्टी (काशीराम ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद ,विनय रतनसिंग यांच्या सूचनेनुसार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, 25 जुलै रोजी हे आंदोलन होणार असून, युवक-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि युवक आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर बलप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली असून, काही व्यक्ती साध्या वेशात आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना मारहाण करत असल्याचेही आरोप समोर आले आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टी (काशीराम ) संघटनेने बुलढाण्यात धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनातून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.
सतीश पवार म्हणाले की, “लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्यासाठी बळाचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेविरोधात बुलढाण्यातील युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीची बाजू मजबूत करावी.”
भीम आर्मीच्या वतीने सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात एकजूट दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
