कृषी यंत्र निर्मितीतून शेती क्षेत्राचे सेवा केल्याबद्दल नवी दिल्लीत गौरव

बुलढाणा – (प्रतिनिधी) भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुढाकाराने नवी दिल्लीत राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या नवोन्मेषी किसान कॉन्क्लेव २०२५ च्या व्यासपीठावर कृषी यंत्र निर्माते तथा शेतकरी पंढरीअप्पा गुंजकर ( उदयनगर, ता. चिखली जि. बुलढाणा ) यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. यावेळी चौहान, राज्यमंत्री भगीरथ चौधरी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव डॉ. एम. एल. जाट, उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव व संचालक डॉ. सी. एच. श्रीनिवासराव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
पंढरीनाथ गुंजकर यांनी १९९७ मध्ये अवजारांच्या जगात पाऊल ठेवले. वडिलांच्या नावे ‘यशवंत’ उद्योगाला सुरुवात केली. प्रारंभी ते तयार अवजारे आणून विकत. तेव्हा कृषी क्षेत्रात नेमकी यांत्रिकिकरणाची चाहूल सुरू झाली होती. मात्र, काळाची गरज ओळखत गुंजकर हे येथेच थांबले नाहीत. श्री. गुंजकर यांनी उदयनगर येथे शेती सांभाळत असतानाच कृषी आधारीत यंत्रे तयार करण्यासाठी छोटासा उद्योग सुरू केला. गेल्या काही वर्षात त्यांच्या या प्रयत्नांचा मोठा वटवृक्ष झाला असून उदयनगर आता कृषीयंत्र निर्मिती क्षेत्रात ओळखले जाते.


