
बुलडाणा (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या आडसूळ येथील रोहिणी गायधने – फाळके यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत राज्यशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी राज्यशास्त्र विषयात त्यांनी नेट आणि सेट परीक्षासुद्धा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा पीएच.डी. साठीचा विषय ‘ए क्रिटीकल स्टडी ऑफ कॉन्ट्रिब्युशन ऑफ पॉलिटीकल अॅक्टीवीजम ऑफ अँजेला डेव्हिस इन दि डेव्हलपमेंट ऑफ ब्लॅक फेमिनिस्ट मूव्हमेंट’ (काळ्या स्त्रीवादी चळवळीच्या विकासात अँजेला डेव्हिस यांच्या राजकीय कृतिशीलतेच्या योगदानाचा चिकित्सक अभ्यास) हा असून शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था (स्वायत्त), अमरावती येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा भोरजार यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
रोहिणी गायधने – फाळके यांना राज्यशास्त्र विषयात अध्यापनाचा अनुभव असून अनेक महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी आजवर राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय चर्चासत्र व परिषदांमध्ये शोधनिबंधांचे वाचन केले आहे. नोबल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या लेखासह काही महत्त्वपूर्ण मूळ इंग्रजी लेखांचे त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित आहेत.
त्यांनी पीएच.डी. साठीचे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करून आचार्य पदवी प्राप्त केल्या बद्दल विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था (स्वायत्त), अमरावतीचे संचालक डॉ. सतीश माळोदे, मार्गदर्शक डॉ. प्रतिभा भोरजार, त्यांचे सासरे पांडुरंग फाळके यांसह कुटुंबीय, आप्तस्वकिय व आडसूळ मधील गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


