Chikhali taluka incident: Financial loot of common people : तलाठी गायब! त्यांनी ठेवलेला व्यक्ती देतो दाखले चिखली तालुक्यातील प्रकार: सर्वसामान्यांची आर्थिक लुट

बुलडाणा ( प्रतिनिधी): चिखली तालुक्यात एक अजब प्रकार सुरू झाला असून ग्रामीण भागात जनता व प्रशासन यांचा दुवा असलेला तलाठी गायब असतो तर त्यांच्या अख्त्यारीत येणारे दाखले देण्याचे काम सदर तलाठ्यांनी कामावर ठेवलेला व्यक्ती देत असतो. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या उत्पन्न दाखला,कास्ट सर्टिफिकेट व इतर कागदपत्रे ऑनलाईन मिळतात हे सत्य आहे. परंतु सदर कागदपत्र मिळवण्यासाठी काही दाखल्यांची पूर्तता करावी लागते. विशेषतः कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी वंशावळ व तत्सम कागदपत्रे तसेच सातबारा सारखी कागदपत्रे तलाठी यांच्याकडून मिळत असतात. ग्रामीण भागात मात्र तलाठी गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र ही कागदपत्रे खोळंबून न राहता तलाठ्यांनी वैयक्तिकरित्या कामावर ठेवलेला व्यक्ती ही कागदपत्रे देतो. विशेष म्हणजे त्याचेजवळ तलाठ्याचा शिक्काही असतो. सदर प्रमाणपत्र व संबंधित दाखला देण्यासाठी तलाठ्याचा अटरण्या प्रत्येकाकडून ४० ते ५० रूपये आकारतो हा प्रकार चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये समोर येत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही बाब कदाचित प्रशासनाच्या लक्षातही आली नसेल अशी शक्यता आहे.


