
बुलढाणा(प्रतिनिधी): आज दि.08 सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू होता त्यात पावसाळ्याची सुरुवात व्हायच्या आतच बुलढाणा-चिखली मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीत जाणाऱ्या शिवछत्रपती नगरच्या बोर्डजवळ आणि डॉ. गोडे यांच्या घरासमोर रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. येथे जणू ‘आरबी समुद्राचा छोटा भाग’ तयार झाल्याचे चित्र आहे.
वाहनधारकांचे हाल होताना दिसत आहे.या मार्गावरून रोज शेकडो दुचाकी, चार चाकी आणि एसटी बस ये-जा करतात. पण रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांची दमछाक होत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. वाहने बंद पडत आहेत.
पायी जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी वाढली
शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. पावसाचे कपडे, वह्या, सायकल सगळे भिजत आहे. “पायी जायचे तर पाय भिजतात, गाडीने जायचे तर घसरून पडतो. जावे तरी कुठे?” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.
नाल्या दाबल्या की दबल्या?
स्थानिकांचा आरोप आहे की पाणी जाण्यासाठी असलेल्या नाल्या एकतर दाबल्या आहेत किंवा त्या दबल्या आहेत. संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली नाही,का? केली असेल तर पाणी का साचले ? त्यामुळे थोडा पाऊस पडला तरी रस्त्याचे तळे होते.
“ही फक्त सुरुवात आहे. अजून जोरात पाऊस पडला तर इथे खऱ्या अर्थाने धरण तयार होईल. मग एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.संबंधित विभागाने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची, नाल्या साफ करण्याची, दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


