
बुलढाणा (प्रतिनिधी ): पाच दिवसांपूर्वी “मूकनायक वार्ता” ने काळवाघे ले आउट ते सारनाथ बुद्ध विहार रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत बातमी प्रकाशित केली होती. तरीही प्रशासनाने डोळेझाक केल्याने आजही हा रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे आणि खड्ड्यात साचले पाणी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
चांडक ले आउट ते शिक्षक कॉलनी: खड्ड्यांचाच रस्ता
चांडक ले आउट ते काळवाघे ले आउट पर्यंतच्या सिमेंट रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अक्षरशः रस्ता खड्ड्यांनी भरला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने रस्ता ओळखूच येत नाही. हा रस्ता चांडक ले आउट पासून शिक्षक कॉलनीकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता आहे.
शालेय विद्यार्थी: शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागते. दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्यांचे नुकसान होत आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे.
“हा चांडक ले आउट पासून ते शिक्षक कॉलनीकडे जाणारा सर्वात महत्वाचा रस्ता आहे. इथून रोज हजारो नागरिक ये-जा करतात. पण 5 दिवसांपूर्वी बातमी छापूनही प्रशासनाला रस्त्यावर येऊन पाहायला वेळ नाही का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला.
रोगराईचा धोका
खड्ड्यातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिमेंटचा रस्ता अक्षरशः खराब झाला असून त्यावर तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे.
मूकनायक वार्ताच्या बातमीनंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन कधी जागे होणार, हा प्रश्न आता सुंदरखेड मधील नागरिक विचारत आहेत.


