mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Old age homes and family culture: A painful reality : वृद्धाश्रम आणि कुटुंबसंस्कृती : एक वेदनादायी वास्तव*

आज भारतात हजारो वृद्धाश्रम उभे राहिले आहेत. मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. हे वृद्धाश्रम म्हणजे केवळ इमारती नाहीत; त्या आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे, तुटत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेचे आणि नात्यांतील दुराव्याचे जिवंत प्रतीक आहेत. परंतु या वास्तवाकडे पाहताना एक प्रश्न अनेकदा समोर येतो की, देशात इतके वृद्धाश्रम असताना त्यामध्ये मुस्लिम समाजातील वृद्ध व्यक्ती फारच कमी का दिसतात? हा प्रश्न केवळ धर्माचा नाही, तर संस्कृती, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांचा विचार करण्यास भाग पाडणारा आहे. भारतीय संस्कृतीत ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ ही संकल्पना हजारो वर्षांपासून सांगितली जाते. आई-वडील हे देवतुल्य आहेत, त्यांची सेवा करणे हे कर्तव्य आहे, असा संस्कार आपल्या समाजात दिला जातो. तरीही आज वास्तव वेगळे दिसते. अनेक वृद्ध आई-वडील आपल्या मुलांच्या घरात नव्हे, तर वृद्धाश्रमात दिवस काढताना दिसतात. ज्यांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई, श्रम आणि प्रेम मुलांच्या भविष्याकरिता अर्पण केले, त्यांनाच शेवटी परकेपणाची शिक्षा भोगावी लागते. हा विरोधाभास समाजाच्या मनाला अस्वस्थ करणारा आहे.

         वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या अनेक वृद्धांच्या कथा ऐकल्या, तर मन हेलावून जाते. काहींची मुले परदेशात स्थायिक झालेली असतात, काहींना मुलांकडे वेळ नसतो, तर काहींना घरातच उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे ते वृद्धाश्रमाचा पर्याय स्वीकारतात. काही वेळा ही निवड स्वेच्छेची नसते, तर परिस्थितीची जबरदस्ती असते. वृद्धाश्रम म्हणजे सुरक्षित आसरा असला, तरी त्यामागे दडलेली वेदना मात्र खोल असते, ती म्हणजे आपल्या लोकांनी दिलेली एकाकीपणाची शिक्षा. परंतु दुसरीकडे मुस्लिम समाजाकडे पाहिले, तर अनेकदा असे दिसते की वृद्ध आई-वडील कुटुंबातच राहतात. संयुक्त कुटुंबाची परंपरा, धार्मिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यामुळे वृद्धांची जबाबदारी ही कुटुंबाचीच मानली जाते. इस्लाम धर्मात पालकांची सेवा ही अत्यंत पवित्र कर्तव्य मानली जाते. कुरआनमध्येही आई-वडिलांच्या सेवेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर ठेवणे हे सामाजिकदृष्ट्या नाकारलेले वर्तन मानले जाते. ही गोष्ट केवळ धार्मिक शिकवणीची नाही, तर संस्कारांची आहे.

      मात्र याचा अर्थ असा नाही की एका समाजात सर्व काही आदर्श आहे आणि दुसऱ्यात सर्व काही चुकीचे आहे. बदलत्या काळात प्रत्येक समाजासमोर आव्हाने उभी आहेत. शहरांमध्ये वाढती स्थलांतराची प्रक्रिया, नोकरीच्या बदलत्या पद्धती, लहान होत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि वाढती स्पर्धा यामुळे नात्यांवरही परिणाम होत आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये आई-वडिलांना वेळ देणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे वृद्धाश्रमांची गरज निर्माण झाली आहे. पण येथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की, आपण विकासाच्या नावाखाली नात्यांचे मूल्य विसरत आहोत का? आधुनिकतेच्या प्रवाहात आपण कुटुंबव्यवस्थेचा पाया दुर्बल करत आहोत का? भौतिक सुखसुविधा वाढल्या असल्या, तरी भावनिक जवळीक कमी होत चालली आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या माध्यमांमुळे संवाद वाढल्यासारखा वाटतो पण प्रत्यक्षात माणसामाणसांतील संवाद कमी होत आहे.

      आज अनेक वृद्ध व्यक्ती म्हणतात “आम्हाला पैशांची गरज नाही, फक्त मुलांनी दोन प्रेमाचे शब्द बोलावेत.” ही साधी अपेक्षा आहे; पण तीही अनेकदा पूर्ण होत नाही. वृद्धाश्रमांमध्ये अनेक आई-वडील दिवसभर आपल्या मुलांच्या फोनची वाट पाहत बसतात. सण-उत्सवांच्या दिवशी त्यांची वेदना अधिक तीव्र होते. कारण त्या दिवशी कुटुंबाची उब सर्वाधिक जाणवते. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील कुटुंबव्यवस्थेचा विचार केला, तर काही मूल्ये शिकण्यासारखी वाटतात. वृद्धांना घरातील मानाचे स्थान देणे, त्यांच्या अनुभवाचा आदर करणे, कुटुंबातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घेणे ही परंपरा अजूनही अनेक ठिकाणी टिकून आहे. ही गोष्ट केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून, ती मानवी मूल्यांची शिकवण आहे. परंतु त्याचवेळी हेही लक्षात घ्यायला हवे की वृद्धाश्रम ही संकल्पना पूर्णपणे नकारात्मक नाही. काही वृद्ध व्यक्ती स्वतःच्या इच्छेनेही वृद्धाश्रमात राहणे पसंत करतात. कारण तेथे त्यांना समान वयाच्या लोकांमध्ये राहण्याची संधी मिळते, आरोग्यसेवा मिळते आणि एकाकीपणाही कमी होतो. त्यामुळे वृद्धाश्रमांना पूर्णपणे दोष देणे योग्य नाही. पण जर कुटुंब असूनही आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहावे लागत असेल, तर ते समाजासाठी नक्कीच चिंतेचे कारण आहे.

      भारतीय समाजाच्या संस्कृतीचा पाया कुटुंबव्यवस्थेवर उभा आहे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही; ते प्रेम, जबाबदारी आणि परस्पर आदर यांचे जिवंत रूप आहे. जर कुटुंबातील नात्यांमध्येच दुरावा निर्माण झाला, तर समाजाच्या मूलभूत मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. आज गरज आहे ती नव्या पिढीला योग्य संस्कार देण्याची. मुलांना लहानपणापासूनच आई-वडिलांचा आदर करणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे शिकवले पाहिजे. शाळा, समाज आणि माध्यमांनीही या विषयावर सकारात्मक संदेश द्यायला हवा. तसेच सरकार आणि समाजानेही वृद्धांच्या समस्यांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन आणि मानसिक आधार या गोष्टी मजबूत करणे गरजेचे आहे. वृद्धांचे आयुष्य सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता आले पाहिजे.

      खरं तर प्रत्येक माणसाचे आयुष्य एक पूर्ण वर्तुळ असते. आज जो तरुण आहे, तो उद्या वृद्ध होणार आहे. त्यामुळे आज आपण वृद्धांकडे कसे पाहतो, त्यावर उद्याच्या समाजाचे चित्र अवलंबून आहे. जर आपण आज आपल्या आई-वडिलांना सन्मान दिला, तर उद्या आपल्यालाही तोच सन्मान मिळेल. वृद्धाश्रमांची वाढ ही केवळ सामाजिक बदलाची खूण नाही; ती एक इशारा आहे, नात्यांची उब जपण्याचा. आपण आधुनिक होऊ, प्रगती करू; पण त्याचवेळी आपल्या संस्कृतीची मुळेही जपली पाहिजेत. कारण माणसाला खरे समाधान संपत्तीमध्ये नाही, तर नात्यांच्या उबेत मिळते. आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्या मुलांसाठी स्वप्ने पाहिली, त्याग केला, संघर्ष केला. त्यांच्या वृद्धत्वात त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते आपुलकी. जर आपण ती देऊ शकलो, तर वृद्धाश्रमांची गरज कदाचित कमी होईल.

      आज समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे की, आपण प्रगतीच्या शर्यतीत धावताना आपल्या आई-वडिलांना मागे तर सोडत नाही ना? जर या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे शोधले, तर कदाचित आपल्या समाजाला नव्या दिशेचा मार्ग सापडेल. वृद्धांचा सन्मान हा केवळ संस्कृतीचा भाग नाही; तो माणुसकीचा पाया आहे. ज्या समाजात वृद्धांचा आदर केला जातो, तो समाज खऱ्या अर्थाने प्रगत मानला जातो. म्हणूनच आज गरज आहे ती नात्यांना पुन्हा जिवंत करण्याची, कुटुंबव्यवस्थेला बळ देण्याची आणि आई-वडिलांच्या प्रेमाचे ऋण कृतज्ञतेने फेडण्याची. कारण शेवटी सत्य एकच आहे, ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवले, त्या हातांना वृद्धत्वात आधार देणे आणि हेच खरे संस्कार आहेत.

प्रविण बागडे

नागपूर मो. क्र. ९९२३६२०९१९

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top