mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A sudden fire broke out at Jaystambh Chowk in Chikhali: चिखलीतील जयस्तंभ चौकात अचानक आगीचा भडका

चिखली (प्रतिनिधी ): दि.15,शहरातील मध्यवर्ती जयस्तंभ चौक परिसरात अचानक भीषण आग लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण करत परिसरातील तब्बल पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौक परिसरातील भेळ सेंटर, बागवान यांचे फळांचे दुकान, घड्याळाचे दुकान तसेच काही इतर लहान व्यावसायिकांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न  केले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गोपाल देव्हडे यांनी स्वतः अग्निशमन दलाची वॉटर गन हातात घेत आग विझवण्यासाठी मदत केली. त्यांच्या या धाडसी कृतीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

या भीषण आगीची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी कुणाल बोन्द्रे, काशिनाथ बोन्द्रे, सुरेंद्र ठाकूर आणि सुहास शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष असे की घटनास्थळापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top