शासनाच्या योजनेतील सौर पंप फुटला, पंचनाम्याची मागणी

चिखली, (प्रतिनिधी): तालुक्यातील अंत्री कोळी शिवारात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सौर पॅनलचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. विहिरीवरील सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
अंत्री कोळी शिवारातील गट क्रमांक 185 मध्ये तुकाराम सीताराम हिवाळे यांची शेती आहे. शेतातील विहिरीतून पाणी उपसण्यासाठी त्यांनी शासनाच्या योजनेंतर्गत सौर पंप बसवला होता. दि. 2 जून 2026 रोजी दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जोराच्या वाऱ्यामुळे पॅनल पूर्णतः फुटून निकामी झाले आहेत.
हिवाळे यांच्या शेतातील संपूर्ण सिंचन व्यवस्था या सौर पॅनलवर अवलंबून होती. पॅनल निकामी झाल्याने विहिरीचे पाणी उपसणे बंद पडले असून पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे आणि उभ्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या या नुकसानीमुळे हिवाळे कुटुंबासमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे.
आता पॅनल फुटल्याने शेतीचे पाणी बंद पडले. संबंधित कृषी विभाग व महाऊर्जा विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी तुकाराम हिवाळे यांनी केली आहे. तसेच नव्याने पॅनल बसवून देण्याचीही विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
