
चिखली (प्रतिनिधी): महिलांवर पाळत ठेवून गर्दीचा फायदा घेत पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला चिखली डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. आरोपीकडून 31,950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 14 मे 2026 रोजी एक महिला वडिलांसोबत चिखली येथे जुने दागिने मोडून नवे बनवण्यासाठी आली होती. त्यांनी 59.41 ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे व 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असे एकूण 31,950 रुपयांचे दागिने बनवले.
दुपारी 2 ते 2:30 च्या सुमारास त्या मनीषा स्टील होम दुकानात ग्लास घेत असताना, मागे उभ्या असलेल्या 40 ते 45 वयोगटातील अनोळखी महिलेने त्यांच्या वायरच्या पिशवीतील दागिने चोरून नेले. याप्रकरणी पो.स्टे. चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पो.नि. भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक तपास करत असताना गुप्त माहिती मिळाली की आरोपी महिला अंबड तालुक्यातील चंदनापुरी येथील आहे.
2 जून 2026 रोजी पोना अमोल गवई, मपोहेकॉ सुर्यकला म्हस्के, पोका अजय इटावा, पोका प्रशांत धंदर यांचे पथक संभाजीनगरला रवाना झाले. आरोपी महिला घाटी हॉस्पिटल परिसरात संशयास्पद फिरताना आढळली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली.
महिला अंमलदार व पंचासमक्ष अंगझडती घेतली असता तिच्याकडे चोरीला गेलेले सोन्याचे 2 डोरले, 4 मणी व चांदीचे जोडवे असे सर्व दागिने मिळून आले. आरोपी सुवर्णा काकासाहेब काळे, वय 40, रा. शेवगाव, जि. अहमदनगर असे तिचे नाव आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकातील अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश साबळे व सुर्यकला म्हस्के यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
