mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A grand football celebration; special event in Buldhana for the FIFA World Cup 2026. :  फुटबॉलचा महाउत्सव; फिफा विश्वचषक २०२६ निमित्त बुलढाण्यात विशेष कार्यक्रम

बुलढाणा, दि. 11 जून : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व्या फिफा विश्वचषक २०२६ निमित्त “हार्दिक शुभेच्छा” कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

“मैदान गाजणार, इतिहास रचला जाणार, गोल होणारच! खेळ भावना जिंकण्याचा–उत्सव फुटबॉलचा!” या घोषवाक्याने खेळाडूंनी फिफा विश्वचषकाला शुभेच्छा देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे होत्या. यावेळी बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. ठाकरे, सचिव एन. आर. वानखेडे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर तसेच सहकार विद्या मंदिरचे क्रीडा विभाग प्रमुख सय्यद आबीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा फिफा विश्वचषक २०२६ ची विशेष फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा देतानाच बुलढाणा जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंनाही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात क्रीडा शिक्षक व एनआयएस हँडबॉल प्रशिक्षक मनोज श्रीवास यांनी फिफा विश्वचषक २०२६ विषयी सविस्तर माहिती दिली. यंदाचा विश्वचषक ११ जूनपासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांत होत असून, प्रथमच ४८ संघ या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भारतीय वंशाचे चार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील १३ व १५ वर्षे वयोगटातील फुटबॉल खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात फुटबॉल खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा, युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश बाफना, मनोज श्रीवास, रमिज चौधरी, राहुल ओशालकर, उज्ज्वला लांडगे आणि डॉ. जीवन मोहोड यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. जीवन मोहोड यांनी तर आभार प्रदर्शन मनोज श्रीवास यांनी केले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top