भीम आर्मी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांची उपोषणस्थळी भेट

बुलढाणा (मूकनायक वार्ता / प्रा. कडुबा पैठणे ): बुलढाणा जिल्ह्यात विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचार, शेतजमिनीच्या मार्गाचा प्रश्न तसेच भूखंड मालकी हक्कासंदर्भातील वाद अशा विविध मुद्यांवर उपोषणे सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. लोणार तालुक्यातील मौजे बिबी व किनगावज येथेजलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी २५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. विनोद किसन इंगळे, राहुल दामोदर इंगळे व इतर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात वारंवार तक्रारी करूनही केवळ औपचारिक चौकशी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम असून दोषींवर कारवाई करून कामांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बुलढाणा तालुक्यातील इजलापूर येथील शेतकरी विजय काकफळे यांनी आपल्या आईसोबत आमरण उपोषण सुरू केले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या नकाशा व रस्त्याच्या नोंदीतील त्रुटींमुळे शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला असून उपासमारीची वेळ आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याचबरोबर डोंगरगाव येथील भूखंड मालकी हक्क प्रकरणातही कथित गैरव्यवहाराविरोधात आमरण उपोषण सुरू आहे. मयत त्र्यंबक ग्यानू सोनटक्के यांच्या भूखंडाबाबत नमुना ८ देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अभिलेख, मालमत्ता नोंदी आणि कथित खोट्या कागदपत्रांच्या चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या तिन्ही आंदोलनांदरम्यान भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच संबंधित विभागांशी संवाद साधून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

डोंगरगाव येथील प्रकरणात त्यांनी गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून उपोषणकर्त्या वृद्ध महिलेला जागा उपलब्ध झाल्यास निवाऱ्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारीही दर्शविली आहे.
