
चिखली (प्रतिनिधी) :मूकनायक वार्ताने करवंड येथील दलित वस्तीतील रस्त्याची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष”ही बातमी प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
बातमीची गंभीर दखल घेत करवंड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. पडघान यांनी तात्काळ कारवाई केली आहे. संबधित ठेकेदाराला 7 दिवसाच्या आतमध्ये रस्ता करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दलित वस्तीतील मुख्य रस्त्यावर पडलेले मुरूमाचे मोठमोठे ढिगारे आणि पसरलेली तीक्ष्ण गिट्टी यामुळे नागरिकांच्या पायाला दुखापत होत होती, शाळकरी मुले आणि वृद्धांना चालताही येत नव्हते. सहा महिन्यांपासून ग्रामपंचायत केवळ दुर्लक्ष करत होती.
परंतु मूकनायकमध्ये बातमी प्रसिद्ध होताच, श्री. पडघान यांनी आज सकाळीच JCB मशीन पाठवून रस्त्यावरील सर्व मुरूमाचे ढिगारे समतल (सवान) केले असून रस्ता चालण्यायोग्य केला आहे.
यामुळे दलित वस्तीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मूकनायक वार्ताचे आभार मानले आहेत.
बातमीचा इम्पॅक्ट झाला, पण…नागरिकांचे म्हणणे आहे की तात्पुरती मलमपट्टी नको, तर या रस्त्याचे कायमस्वरूपी सिमेंट कॉंक्रिटीकरण करावे. जोपर्यंत पक्का रस्ता होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे तरुणांनी सांगितले.


