बुलढाणा (प्रतिनिधी) दि. १९ ऑक्टोबर २०२६ -* महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना बँका व खाजगी फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी, बचत गटातील महिला आणि छोट्या उद्योजकांकडे सक्तीची व जोर-जबरदस्तीने कर्ज वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स, L&T, मुथूट, बंधन बँक व इतर मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट थेट कर्जदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ, धमकावणे, अपमान, फोटो-व्हिडिओ काढणे असे प्रकार करत आहेत. पिकं नष्ट झाल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांवर मानसिक तणाव वाढत असून आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
काय आहेत मागण्या?
या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत :
१):दुष्काळग्रस्त भागातील सर्व कर्जदारांना पुढील एक वर्ष कर्ज परतफेडीस स्थगिती (Moratorium) जाहीर करावी.
२):या कालावधीत कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली, जप्ती किंवा कायदेशीर कारवाई थांबवावी.
३):या काळात कर्जदारांचा CIBIL स्कोर खराब करू नये, तो अबाधित ठेवण्याचे आदेश बँकांना द्यावेत.
यावेळी निवेदनकर्ते सतीश पवार म्हणाले की, “दुष्काळात शेतकऱ्यांकडे खायला अन्न नाही, अशा वेळी फायनान्स कंपन्यांचा गुंडगिरीसारखा वसुलीचा तगादा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सक्तीची वसुली थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
हे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री, RBI आणि पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहे
