बुलढाणा दि.22 (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास कार्यालय यांच्यामार्फत कोविड-१९, नैसर्गिक किंवा अकस्मात कारणांमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. पात्र बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
ज्या बालकांचे आई-वडील दोघेही नैसर्गिक, अकस्मात अथवा कोविड-१९ मुळे निधन पावले आहे आणि पालकांच्या निधनाच्या वेळी संबंधित बालकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते, अशा बालकांना शासन नियमानुसार अनाथ प्रमाणपत्र मिळू शकते. यासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बसस्थानकाच्या मागे, जोशी नेत्रालयाजवळ, मुठ्ठे ले-आऊट, बुलढाणा येथे संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे : विनंती अर्ज, आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, बालकाची शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचा निर्गम उतारा (इयत्ता ४ थी किंवा ७ वी), जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आधार कार्ड, आई-वडिलांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयाचा कोविड मृत्यू अहवाल (आवश्यक असल्यास), बालकाचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
पात्र बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
