
चिखली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करवंड गावात रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिक हैराण आहेत.पावसाळा सुरू होताच करवंड गावच्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था उघड झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे डबके दिसत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘प्रशासन काय करतंय?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
गावात येणाऱ्या-जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, आणि दुचाकी स्वारांना या चिखलातून वाट काढावी लागत आहे. अनेकदा वाहने चिखलात रुतून बसतात. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तर रस्ता ओलांडणेही जिकिरीचे झाले आहे.
आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता
साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यातून साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे. “रस्त्यावरचा चिखल आणि घाणेरड्या पाण्याचा दुर्गंध घरात येतो. लहान मुलं आजारी पडत आहेत” अशी तक्रार एका ग्रामस्थाने केली.
ग्राम प्रशासनाने लक्ष द्यावे
पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती आणि नाली सफाईची कामे झालीच नाहीत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गावचा मुख्य रस्ताच जर अशा अवस्थेत असेल, तर विकासाच्या गप्पा कशासाठी, अशी चर्चा गावात सुरू आहे.
ग्राम प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील चिखल आणि साचलेले पाणी काढावे, नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी करवंडच्या ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
