प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष नाही: उपाय योजनाही शुन्य

बुलढाणा / प्रतिनिधी
बुलढाणा शहरासह परिसरात पेट्रोल टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर ‘लॉकडाऊन लागू होणार’ तसेच ‘पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे’ अशा प्रकारच्या संदेशांचा वेगाने प्रसार होत असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली आहे. परिणामी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. जयस्तंभ चौक, मलकापूर रोड, रिलायन्स, पोलीस पेट्रोल पंप, सोसायटी पेट्रोल पंप तसेच सैलानी रोडवरील पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याचे चित्रही दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रकारावर स्पष्ट भूमिका घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही अधिकृत तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये तसेच सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर कुठलेही लक्ष नसून पेट्रोल पंपांवरील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्याही उपाय योजना केले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा वापर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकार्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. खुले इंधन विक्रीवर बंदी: कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये भरून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून दिले जावे. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठा करताना प्राधान्य देण्याच्या सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोजचा उपलब्ध साठा आणि मागणीची माहिती फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि विक्रीच्या नोंदी नियमित अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दंडात्मक कारवाईचा इशारा:*
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

वाहनांमध्ये अनावश्यक साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


