
चिखली / प्रतिनिधी
तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळेतील शिक्षक शुभम दिनकर बुरकुल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा बुलढाणा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला. विविध शैक्षणिक स्पर्धा, संगणक शिक्षण, क्रीडा व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी शाळेचा उल्लेखनीय शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विक्रमी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ASSIEE सैनिकी शाळा पूर्व परीक्षेत शाळेतील दोन विद्यार्थिनी मुलाखतीस पात्र ठरल्या आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल बुलढाणा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शुभम बुरकुल यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शिक्षक शुभम बुरकुल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक बंगाळे सर, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले आहे. या उल्लेखनीय निकालामुळे शाळेच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एका उज्ज्वल यशाची भर पडली असून परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
