
खामगाव (प्रतिनिधी) दि.12 , चिखली येथून परीक्षा देऊन गावी परतणाऱ्या बाप-लेकाच्या दुचाकीला रानडुकराने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी 2.30 ते 3.00 वाजेच्या सुमारास गारडगाव फाट्यानजिक घडली.
प्राप्त माहितीनुसार, MH 28 Y9287 क्रमांकाच्या दुचाकीवरून हे दोघे प्रवास करत होते. अचानक रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकराने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार खाली फेकले गेले. एकाची प्रकृती गंभीर तर दुसरा जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने खाजगी वाहनाने शासकीय ग्रामीण रुग्णालय, खामगाव येथे दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
सदर घटना खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
