जळगाव जामोद, (प्रतिनिधी )– देवचंद्र समदूर*:
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ मे २०२६ रोजी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास भेंडवळ बुद्रुक येथील रहिवासी शहादेव शंकर भारसाकळे याने कौटुंबिक रागाच्या भरात आपली पत्नी मायावती शहादेव भारसाकळे, वय ४६ वर्षे, यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने गंभीर वार केले. हल्ला इतका भीषण होता की मायावती या रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळल्या.
आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा मंगेश शहादेव भारसाकळे, वय २३ वर्षे, तात्काळ धावून आला. त्याने जखमी अवस्थेतील आईला उपचारासाठी सामान्य रुग्णालय, खामगाव येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मायावती यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा मंगेश भारसाकळे याच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती शहादेव भारसाकळे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ३१५/२०२६, कलम १०३(१) BNS अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करत आहेत.
