
बुलढाणा(प्रतिनिधी):सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीतील काळवाघे ले आऊट पासून ते विहारपर्यंत मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोठे खड्डे, चिखल आणि खचलेला रस्ता यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची अशीच अवस्था आहे.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातच एका ठिकाणी रस्ता खचला असून मोठा ट्रक उभा राहिल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
गावातील रस्ते दुरुस्त करणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र सुंदरखेड ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा तोंडी,लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
“आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रोज जीवावर उदार व्हावे लागते. सायकल खेळतांना त्यांना दुखापत होते.जर लवकर रस्ता दुरुस्त झाला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला बारमाही रस्ता देण्याचे शासनाचे धोरण असताना सुंदरखेडमधील ही परिस्थिती गंभीर आहे. ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि ग्रामविकास विभागाकडे त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
