

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांला बेदम मारहाण, पालकांमध्ये संतापाची लाट
खामगाव – (प्रतिनिधी)
तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणित चुकले या रागातून शिक्षकाने अवघ्या साडेनऊ वर्षाच्या इयत्ता चौथीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियम, मार्गदर्शक सूचना आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कागदावरच आहे का? असा सवाल उपस्थित होतोय
पवन इंगळे (वय ९1/2) असे या चिमुकल्या विद्यार्थ्याचे नाव असून वर्गशिक्षक रवींद्र चीम यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण इतकी क्रूर होती की पवन इंगळे या विद्यार्थ्याला थेट खामगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर की ? विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचं केंद्र, असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
१३ डिसेंबर रोजीच राज्य शासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्या सूचनांची पायमल्ली करत शिक्षकाकडून थेट शारीरिक अत्याचार झाला तरी ना तात्काळ गुन्हा दाखल, ना निलंबन, हे प्रशासनाचं अपयशच म्हणावं लागेल ?
पिंपळगाव राजा पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी विद्यार्थ्याला रुग्णालयात पाठवले आहे. वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की, लहान मुलाला मारहाण होईपर्यंत वाट कसली पाहायची ?
या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आता पोलीस आणि शिक्षण विभाग खरोखर कारवाई करतात का. बघ्याची भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच आहे.
