mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Promotion of education and self-employment for transgender individuals; appeal to avail benefits of scholarship and seed capital schemes: तृतीयपंथीयांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराला चालना; शिष्यवृत्ती आणि बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलढाणा दि.22 (प्रतिनिधी) :  तृतीयपंथीय व्यक्तींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. पात्र तृतीयपंथीयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE)’ या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. ही योजना https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलद्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये इयत्ता ९ वीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

अर्जदार भारतीय नागरिक तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी केलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. शिष्यवृत्तीची संख्या मर्यादित असल्याने लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १३ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

याशिवाय राज्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील तृतीयपंथीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांकडे तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत २१ प्रकारच्या लघुउद्योगांसह इतर १२ प्रकारच्या व्यवसायांसाठी आवश्यक साधनसामग्री व टूल किट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. २५ हजार रुपयांपर्यंत लघु कर्ज, ५० हजार रुपयांपर्यंत मध्यम कर्ज आणि २ लाख रुपयांपर्यंत दीर्घ कर्ज यापैकी एक कर्ज मंजूर करण्यात येईल. यामध्ये लाभार्थी हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि राष्ट्रीयकृत बँकेमार्फत ५० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

व्यवसायासाठी आवश्यक परवाने, यंत्रसामग्रीची कोटेशन व बिले, जागेचा ७/१२ उतारा किंवा भाडेकरार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयात सादर करावेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर ३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. इच्छुक तृतीयपंथीय लाभार्थ्यांनी योजनांची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top