
बुलढाणा (प्रतिनिधी) : नीट, जेईई, नेट सारख्या राष्ट्रीय परीक्षांपासून ते महाराष्ट्रातील TET पर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्र शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व सुजाण नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
पेपरफुटी म्हणजे देशद्रोह आहे
पेपरफुटी ही केवळ भ्रष्टाचार नसून तरुणांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या सुरक्षेशी केलेला खेळ आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
भीम आर्मीचे आवाहन
यावेळी भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “हा लढा कोणत्याही एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. हा आपल्या मुलांच्या भविष्याचा लढा आहे. पक्ष संघटनेच्या मर्यादा ओलांडून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि नागरिकाने या महामोर्चात सामील व्हावे” असे आवाहन त्यांनी केले.
मागण्या:
1. धर्मेंद्र प्रधान व दादा भुसे यांचा तात्काळ राजीनामा
2. नीट, TET सह गेल्या 5 वर्षातील सर्व पेपरफुटी प्रकरणांची CBI किंवा न्यायालयीन समितीद्वारे निष्पक्ष चौकशी
3. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शासन
4. बाधित विद्यार्थ्यांना मोफत पुनर्परीक्षा व नुकसानभरपाई
15 दिवसांचा दिला अल्टिमेटम : शासनाने वरील मागण्यांवर पंधरा दिवसांच्या आत ठोस निर्णय न घेतल्यास बुलढाणा जिल्ह्यातून जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.
